बुधवार, ७ जुलै, २०२१

मौनमुद्रा - शांता शेळके

आतल्या हळवेपणावर
तिने आता चढवले आहे
एक भरभक्कम चिलखत,
मनात नसेल तेव्हा
अतिपरिचित स्नेह्यांनाही
ती नाही देत प्रतिसाद, नाही ओळखत.

तिच्यासमोर अनेक प्रश्नचिन्हे
डोळे वटारुन बघणा-या समस्या
ज्यांच्याशी करायचा आहे तिचा तिलाच मुकाबला,
आता कुठे तडजोड नाही
लाचार माघार नाहीच नाही
तिचा लढाच आहे मुळी इतरांहून वेगळा.

तसे वॄक्ष अजूनही बहरतात
फुलांनी गच्च डवरतात
हृदयतळातून फुटतात अंकुर, झुलतात पाने,
एका अज्ञात आकाशात
शुभ्र शुभ्र भरारी घेतात
गातातही पाखरे तिच्या आवडीचे एकुलते गाणे.

आतले विश्व समॄध्द संपन्न
जपत कराराने मनोमन
बाहेर मात्र ती रुक्ष, कोरडी, नि:स्तब्ध,
प्रचंड कल्लोळ प्राणांत सावरीत
डोळ्यातले पाणी प्रयासाने आवरीत
ओठांवरची मौनमुद्रा उकलून ती बोलते मोजका शब्द

घुंगुर - इंदिरा संत

 माझ्या मनिचे खुळे पाखरु

मणिबंधावरि तुझ्या उतरले;

आणिक तू तर दुष्टनष्टसा

घुंगुर त्याच्या पदी बांधिले

एक सवय - इंदिरा संत


इसापनीतीतील ’इ’ गिरवायला घेतली
तेव्हापासून जडलेली, अजूनही नसुटलेली
ही सवय
तात्पर्य काढण्याची. तात्पर्य
आलेल्या कडूगोड अनुभवांचे.
सुखदु:खाच्या प्रसंगांचे.
चालण्याचे. बोलण्याचे. वागण्याचे.
आपले. दुसऱ्याचे. सर्वांचे.
तात्पर्य.

वाटले होते या तात्पर्यांच्या दणकट
खुंट्या रोवून सहज सहज चढावा
हा संसारगड : हा बिकट उभा चढ
श्रेयाकडे पोचणारा.

पण कुठले काय?
ही तात्पर्ये म्हणजे अगदी मऊसूत
लवचिक.
बसल्या बसल्या वळून लोंबत सोडलेल्या
शेवयांसारखी. सुखासीन.

आजपर्यंतच्या या तात्पर्यांच्या
घनदाट झिरमिळ पडद्यामधे उभी असलेली
मी. एकदा वाटते,
कोण ही कैद!
एकदा वाटते, किती मी सुरक्षित!

नवे सुभाषित - धामणस्कर

माझी चाहूल लागताच पक्षी
घाबरुन आकाशात उडाला...

मी माझ्या सुभाषितांच्या वहीत एक
नवीन वाक्य लिहिले :

क्षुद्रांकडून धोका संभवताच शहाणे
विराटाकडे धाव घेतात...

ओढ - संजीवनी बोकील

दाराशी पोरकं
गोजिरं बाळ
रडत असावं
तसं अनौरस सुख
अनेकदा येतं आयुष्यात...
उचलावं तर
ते आपलं नसल्याचं भय
अन
पाठ फिरवावी तर
त्याच्या मोहमुठीत
अडकलेला पदर

सोमवार, २५ सप्टेंबर, २०१७

दिसली नसतीस तर - बा. भ. बोरकर

रतन अबोलीची वेणी माळलेली
आणि निळ्या जांभळ्या वस्त्रालंकारात
संध्येसारखी बहरलेली तू
तळ्याकाठच्या केवड्याच्या बनात
आपल्याशीच हसताना मला दिसली नसतीस
तर आज माझ्या जीवनाच्या अस्ताचलावर
हा भुलावणा सप्तरंगी सोहळा
असा सर्वांगांनी फुलारलाच नसता.

आपल्याच नादात तू
पाठ फिरवून परत जाताना
तुझी पैंजणपावले जिवघेण्या लयीत
तशी पडत राहिली नसती
तर माझ्या आनंदविभोर शब्दांतून
कातरवेळची कातरता
आज अशी झिणझिणीत राहिलीच नसती.

अबोलकेपणाच्या गूढ गाढाईने
जाईजुईच्या सान्द्र मंद सुगंधाचा लळा
सहज चुकार स्पर्शाने तू मला लावला नसतास
तर उमलत्या फुलपाखरांची
आणि मुक्याभाबड्या जनावरांची
आर्जवी हळूवार भाषा
इतक्या स्पष्टपणाने मला कळलीच नसती.

तू कशामुळे माझी जिवलग झालीस
ते खरेच मला आता आठवत नाही
पण मला तोडताना
समुद्रकाठच्या सुरुंच्या बनात
मिट्ट काळोखातून चंद्रकोर उगवेपर्यन्त
तू मुसमुसत राहिलीस
हे मात्र मी अजून विसरू शकलेलो नाही.
त्या वेळची तुझी ती आसवे
अजून माझ्या कंठाशी तुडुंबलेली आहेत.
तू तेव्हा तशी मुसमुसली नसतीस
तर माझ्या शृंगाराचा अशोक
आज करुणेच्या आरक्त फ़ुलांनी
असा डवरलाच नसता.

तू तेव्हा आकाशा एवढी विशाल
आणि अवसेच्या गर्भासारखी दारूण
निराशा मला देउन गेली नसतीस
तर स्वत:च्याच जीवन-शोकांतिकेचा
मनमुराद रस चाखून
नि:स्संग अवधूतासारखा
मी या मध्यरात्रीच्या चांदण्यात
असा हिंडत राहिलोच नसतो.

तू केवळ माझी प्रेयसी नव्हतीस
माझी सशरीर नियती होतीस.
तसे नसते तर आज जो काय मी झालो आहे
तो झालोच नसतो.

लावण्यरेखा - बा. भ. बोरकर

देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे
गोरटे वा सावळे या मोल नाही फारसे

तेच डोळे देखणे जे कोंडिते सार्‍या नभा
वोळती दुःख जगाच्या सांडिती चंद्रप्रभा

देखणे ते ओठ जे की ओविती मुक्ताफळे
आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळे

देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे
मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे

देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती
वाळवंटातूनी सुध्दा स्वस्तिपद्मे रेखिती

देखणे ते स्कंध ज्या ये सूळ नेता स्वेच्छया
लाभला आदेश प्राणी निश्चये पाळावया

देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके
चांदणे ज्यातून फाके शुभ्र पार्‍यासारखे



देखणा देहान्त तो जो सागरी सूर्यास्तसा
अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा