बुधवार, ६ सप्टेंबर, २०१७

असा मी.. तसा मी.. कसा मी कळेना... विंदा करंदीकर,

कधी येतसे क्षुद्रता कस्पटाची; 
कधी वाढता वाढता व्योम व्यापी
कधी धावतो विश्व चुंबावयाला
कधी आपणाला स्वहस्तेच शापी

कधी याचितो सत कधी स्वप्न याची
कधी धावतो काळ टाकुन मागे
कधी वर्षतो अमृताच्या सरी अन
कधी मृत्युच्यी भाबडी भीक मागे 

कध दैन्यवाणा, निराधार होई
कधी गुढ, गंभीर, आत्मप्रकाशी
कधी गर्जतो सागराच्या बळाने;
कधी कापतो बोलता आपणाशी !

कधी आपणा सर्व पिंडात शोधी;
कधी पाहतो आत्मरुपात सारे;
कधी मोजीतो आपणाला अनंते
अणुरुप होती जिथे सुर्य, तारे

टळेना अहंकार साध्या कृतीचा;
गळेना महापुच्छ स्वार्थी स्मृतीचे;
कधी घेतसे सोंग ते सत्य वाटे !
कधी सत्य ते वाटते सोंग साचे ! 

कधी संयमी, संशयात्मा, विरागी
कधी आततायी, कधी मत्तकामी
असा मी.. तसा मी.. कसा मी कळेना;
स्वतःच्या घरी दुरचा पाहुणा मी !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा