भव्य हिमालय तुमचा अमुचा केवळ माझा सह्यकडा
गौरीशंकर उभ्या जगाचा, मनांत पूजीन रायगडा
तुमच्या अमुच्या गंगा यमुना, केवळ माझी भिंवरथडी
प्यार मला हे कभिन्न कातळ, प्यार मला छाती निधडी
मधुगुंजन लखलाभ तुम्हांला, बोल रांगडा प्यार मला
ख्रिस्त बुद्ध विश्वाचे शास्ते, तुकयाचा आधार मला

धिक तुमचे स्वर्गही साती
इथली चुंबीन मी माती
या मातीचे कण लोहाचे, तृणपात्यांना खड्गकळा
कृष्णेच्या पाण्यातून अजुनी, वाहतसे लाव्हा सगळा

कबीर माझा, तुलसी माझा, ज्ञानेश्वर परी माझाच
जयदेवाचा जय बोला परी, माझा नाम्याचा नाच
जनीं जनार्दन बघणारा तो, "एका" हृदयी एकवटे
जनाबाईच्या ओवीमध्ये, माझी मजला खूण पटे
इंद्रायणीच्या डोहामधली, गाथा ओली ती ओली
ती माझी मी तिचाच ऐसी; जवळीक कायमची झाली

भक्तीचा मेळा दाटे,
चोख्याची पैरण फाटे
निर्गुण मानवतेची पूजा, करणारे करू देत भले
माझ्यासाठी भीमाकांठी, भावभक्तीची पेठ खुले

रामायण तर तुमचें अमुचे, भारत भारतवर्षाचें
छत्रपतींची वीरकहाणी, निधान माझ्या हर्षाचें
रजपुतांची विक्रमगाथा, तुमच्यापरी मजला रुचते
हृदयाच्या हृदयांत; परंतू बाजी बाजीची सुचते
अभिमन्युचा अवतारच तो, होता माझा जनकोजी
दत्ताजीचा शेवटचा तो, शब्द अजुन हृदयामाजीं

बच जाये तो और लढे,
पाउल राहील सदा पुढे
तुम्हास तुमचें रुसवेफुगवे, घ्या सगळा नाजुक नखरा
माझ्यासाठी, राहील गांठी, मरहट्याचा हट्ट खरा

तुमचें माझें ख्यालतराणे, दोघेही ऐकू गझला
होनाजीची सोनलावणी, वेड लावते परी मजला
मृदुंग मोठा सुमधुर बोले, मंजुळ वीणा अन मुरली
थाप डफावर कडकडतां, परी बाही माझी फुरफुरली
कडाडणारा बोल खडा जो, दरी-दरीमधुनी घुमला
उघडुनी माझ्या हृदयकवाडा, तोच पवाडा दुमदुमला

तटातटा तुटती बंद,
भिंवईवर चढते धुंद
औट हात देहांत अचानक, वादळ घुसमटुनी जातें
उचंबळे हृदयात पुन्हा तें, इतिहासाशी दृढ नातें

कळे मला काळाचे पाउल, द्रुतवेगानें पुढती पडे
कळे मला क्षितिजाचे वर्तुळ, क्षणोक्षणी अधिकची उघडे
दहा दिशांचे तट कोसळले, ध्रुव दोन्ही आले जवळी
मीही माझें बाहू पसरून, अवघ्या विश्वातें कवळी
विशाल दारे माझ्या घरची, खुशाल हीं राहोत खुली
मज गरीबाची कांबळ वाकळ, सकळांसाठी आंथरली

मात्र भाबडया हृदयांत,
तेवत आहे जी ज्योत
ती विझवाया पहाल कोणी, मुक्त करून झंझावात
कोटी कोटी छात्यांचा येथे, कोट उभारू निमिषांत

(सेतू, १९५७)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा