येता पाऊस पाहुणा आलं हिरवं उधाण,
डोंगरातुन फुटलं हिरवळीचं धरण.
रान हिरव्या लोंढ्यात जाता अवघं वाहून,
पानं पाउस पिऊन गेली नवीन होऊन.
ऊन पकडाया सर आली धावत दारात,
कशी रमली दोघंही पाठशिवीच्या खेळात.
पाणी वाहते लावुनी अंगी मातीचं उटणं ,
तरी नभाने राखलं कसं त्याचं निळेपण.
रेषा आखुनि पानात थेंब डाव मांडतात,
छेड काढता झुळूक आपसांत भांडतात.
उतरवून लकेरी निळ्या कागदाच्या वर,
तळं पसरत गेलं काठ सोडुन बाहेर.
टाळ्या वाजवत गेली फुलपाखरं मजेत,
जणू फुलंच निघाली देठावरूनी उडत.
सारी पाखरे उतारु करतात किलबिल,
दिला झाडाने ऋतुला गर्द हिरवा कंदील !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा