गुरुवार, ७ सप्टेंबर, २०१७

रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी ! – कुसुमाग्रज

समर भूमीचे सनदी मालक शत युद्धाचे मानकरी
रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी !!

घोरपडीला दोर लावूनी पहाड-दुर्गट चढलेले !
तुटून पडता मस्तक खाली धुंद धडाने  लढलेले !
खंदकातल्या अंगावर हासत खेळत पडलेले !
बाप असे कलिकाळ आमुचा कीर्त गाजली दिगंतरी !
रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी !!

या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची !
दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची !
पहाड डोंगर इथे संगती अजिंक्यता अभिमानाची !
जगदंबेचा पालव येथे लढ्वैय्यांच्या सदा शिरी !
रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी !!

करवत कानस कोणी चालवो, पिकावो कोणी शेत मळा !
कलम कागदावरी राबवो धरो कोणी हातात तुळा !
करात कंकण असो कोणाच्या व भाळावर गंध टिळा !
शिंग मनोरयावरी वाजता उभी छावणी घरोघरी !
रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी !!

पोलादी ‘निर्धार’ अमुचा असुरबळाची खंत नसे !
स्वतंत्रतेच्या संग्रामाला ‘विजया’ वाचून अंत नसे !
श्रद्धा हृदयातील आमुची वज्राहुनी बळवंत असे !
मरण मारुनी पुढे निघाले गर्व तयांचा कोण हरी !
रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी !!

भरत भूमीचा वत्सल पालक देव मुनींचा पर्वत तो !
रक्त दाबुनी उरात आम्हा आर्त स्वराने पुकारतो !
“हे सह्याचल, हे सातपुडा !” शब्द अंतरा विदारतो !
“त्या रक्ताची, त्या शब्दाची” शपथ अमुच्या जळे उरी !
रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी !!

जंगल जाळा परी मराठा पर्वतश्रेष्ठा उठला रे !
वणव्याच्या आडदांड गतीला अडसर आता कुठला रे !
तळातळातुनी ठेचून काढू हा गनिमांचा घाला रे !
स्वतंत्रतेचे निशाण आमुचे अजिंक्य राखू धरेवरी !
रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा