बुधवार, ६ सप्टेंबर, २०१७

निळा - बा. भ. बोरकर

एक हिंवटीचा निळा
एक धुवटीचा निळा
दूर डोंगरांतला एक 
जरा त्यांच्याहून निळा

मोरपिसाच्या डोळ्याचा
 एक मखमाली निळा
इंद्रनिळांतला एक  
राजबिंड निळा

विसावल्या सागराचा 
एक ओलसर निळा
आकाशाच्या घुमटाचा 
एक गोलसर निळा

असे नानागुणी निळे 
किती सांगू त्यांचे लळे?
ज्यांच्यामुळे नित्य नवे 
गडे तुझे माझे डोळे 

जेथे उगवे मावळे 
त्यांचा लावण्यसोहळा
असा कालिंदीच्या काठी 
एक इंदीवर निळा 

होऊ आपणही निळ्या 
करू त्याशी अंगसंग
निळ्या झाल्या त्यांच्यासंगे 
रंग खेळतो श्रीरंग

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा