बुधवार, ६ सप्टेंबर, २०१७

सकाळी उजाडता उजाडता - पद्मा गोळे

सकाळी उजाडता उजाडता उठले,
पाहिलं,- आणि कमालंच !
एक वीट निखळलेली.
मी उचलून लावली, ती जिथल्या तिथे..

पुन्हा चार दिवसांनी
पूर्वा लाल व्हायच्या आधीच उठले,
पाहिलं, तर अर्ध्या‌अधिक विटा उचकटून फेकलेल्या !

पुन्हा माझी कारागिरी.
पुन्हा काही दिवसांनी
मध्यरात्रीच जाग आली,
पाहिलं :

थडगं पूर्ण उस्कटलेलं !
आणि उघडलेल्या शवपेटीत
मन चक्क डोळे चोळीत
उठून बसलेलं!

तसं रडतच होतं म्हणा. पण जिवंत?
अकल्पनीय!
म्हणजे थडगं बांधूनही मन...
याला निलाजरं म्हणायचं की असहाय्य !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा